समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले । विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद: स्पर्शं क्षमस्वमे ॥


रात्रभरची विश्रांति झाल्यावर आपण उठतो, पाय भूमिवर ठेऊन उभे राहतो आणि क्षमायाचना करतो त्यावेळेसचे हे संबोधन आहे. यात विष्णु पत्नी म्हणजे पृथ्वीदेवीची स्तुती केली आहे आणि माझ्या पायांचा स्पर्श तुला होणार आहे, म्हणून मी तुला नमस्कार करतो, मला क्षमा कर अशी विनंती पण या पृथ्वीला केलेली आहे. तसं पाहिलं तर पृथ्वी हा सूर्यमालेतला जीवसृष्टि धारण करणारा एकमेव ग्रह आहे. मग इथे देवत्व कशाला बहाल केलंय असा सामान्यजनांना प्रश्न पडेल. पण कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या संस्कृतीचा स्थायी भाव आहे आणि म्हणून सूर्य, चंद्र, अग्नी, जल, वायु यांना आपण महत्व देतो.    

हिंदू धर्मात पृथ्वीला विष्णुपत्नी लक्ष्मी मानले गेले आहे. ऋग्वेद, अथर्ववेद, भूमी सूक्त आणि इतर ग्रंथात पृथ्वीचा उल्लेख आढळतो. पृथ्वीची अनेक नावे आहेत. भूमी, भुवनी, भुवनेश्वरी, अवनी, वसुमती, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी, विष्णुपत्नी, द्यावापृथिवी इत्यादी. आपण पृथ्वीला धरतीमाता म्हणतो तसे, फक्त भारतातच हे महत्व नाही, तर इंडोंनेशियात सुद्धा पृथ्वीला राष्ट्रीय महत्व आहे. पृथ्वी देवतेची( Ibu Pertiwi ) मूर्ती त्यांच्याकडे पण आहे.

     धरतीमाता आपली पोषणकर्ती आहे असे मानले जाते आणि ते खरंच आहे. पृथ्वी मानवाचे निवासस्थान आहे. मनुष्याच्या विविध गरजा भागवण्यासाठी लागणार्‍या सर्व वस्तु त्याला पृथ्वी मधूनच मिळतात. साधं अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजासुद्धा पृथ्वीपासून मिळणार्‍या द्रव्य/ वस्तूंपासूनच मिळत असतात. ही द्रव्य  जमिनीतून महासागरातून आणि वातावरणातून मनुष्याला मिळत असतात. गोडे पाणी, शेतजमिनी, खनिजपदार्थांचे साठे, प्राणिसृष्टी, जंगले आणि कुरणे यापासून औषधे ते पोलादापर्यंतच्या सर्व वस्तु बनवता येतात. जमिनीवरील या साधनसंपत्तीप्रमाणे सागरी संपत्तीचा उपयोग आणि वातावरणातून मिळणा-या प्राणवायू (ऑक्सीजन), नत्रवायू (नायट्रोजन) यांचाही उपयोग होत असतो. मानवाला निसर्गाकडून मिळणारी ही साधनसंपत्ती आहे. सर्व जीवनोपयोगी वस्तु पृथ्वीपासूनच मिळत असल्याने कृतज्ञतेपोटीच प्राचीन काळापासून पृथ्वीची प्रार्थना केली जाते. म्हणूनच शांखायन अरण्यकात पृथ्वीला ‘वसुमती’ म्हटलेलं आहे. म्हणजे संपत्तीने परिपूर्ण अशी. या संपत्तीचा उपयोग आदिमानव करत होता. तो त्यावर अवलंबून होता आणि आजपण मानव तितकाच या नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून आहे, जरी सुखसोयीसाठी असंख्य साधने त्याने निर्माण केली असली तरीही.          

 नुसती पृथ्वीवरची भुस्वरूपे बघितली तरी, पर्वत, दर्‍या, खचदर्‍या, समुद्र, उपसागर, आखात, भूशिरे, ज्वालामुखी बेटे, किनारे, सरोवरे, नद्या, हिमनद्या, त्रिभुज प्रदेश, वाळवंटे इतकी आहेत. या सगळ्यांवर भरती, ओहोटी, लाटा, पाऊस, प्रवाह, जमीन वर उचलली जाणे/ खचणे, हवामान बदल, ज्वालामुखी, भूकंप यांचा परिणाम महासागर आणि जमिनीवर नैसर्गिकपणे होत असतोच. त्यात मानवाने भौतिक विकास करून यावर परिणाम करणार्‍या घटकांची आणखी भर घातली आहे. ग्लोबल वॉर्मिंग सर्वजण जाणतो. त्याचप्रमाणे प्रदूषण ही एक अक्राळविक्राळ जागतिक समस्या झाली आहे. याचे मूळ कारण म्हणजे निसर्गाचा बिघडलेला समतोल. नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर आणि गैरवापरसुद्धा हा समतोल ढळायला कारणीभूत  आहे.     

अधिक वाचा  संघ, जातीयवाद आणि डॉ. हेडगेवार

 भौतिक सुखाचे जग हा विकास वाटत असेल तर आधी जमिनीवर या म्हणजे पृथ्वीवर या, ती आहे म्हणून आपण आहोत. आधी तिला वाचवा. पृथ्वी म्हणजे पाणी, वन्यप्राणी, वनश्री, प्रदूषण आणि याच्याशी संबधित सर्व काही आले. प्लॅस्टिक, कागद, इलेक्ट्रोनिक कचरा यांचा अमर्याद वापर वाढला आहे. हवा, पाणी आणि आवाज प्रदूषण वाढलं आहे. आज कोरोंना साथी मध्ये आपण रोज बघतोय की जगण्यासाठी श्वास घेणं किती महत्वाच आहे. शुद्ध हवा अर्थात ऑक्सीजन किती आवश्यक आहे, सतत काही ना काही नैसर्गिक संकटामुळे जागतिक पातळीवर पृथ्वीला वाचवण्याची चर्चा होते, विचार होतो. काही काळाने ते हवेत विरून जाते, पुन्हा रहाटगाडगं चालू आणि मग वर्षातून एक दिवस ‘डे’ आला की पुन्हा त्याचा एक दिवस विचार. असा पृथ्वी वाचवण्याचा ‘डे’ साजरा होतो दरवर्षी.                

     सन १९७० पासून हा ‘अर्थ डे’ जगभर साजरा केला जातोय. जगातील पहिला अर्थ डे साजरा झाला २२ एप्रिल १९७० ला अमेरिकेत. अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन राज्यातील तेंव्हाचे सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी पुढाकार घेऊन, संपन्नतेचे लक्षण म्हणून गाड्या असणे व त्याच्या इंधनाच्या धुरामुळे वातावरणाला कसा धोका आहे, हे त्यांनी लाखो लोकांसमोर आणले. तेंव्हापासून हा दिवस अर्थ डे म्हणून पाळतात. त्यासाठी स्वच्छ हवा, पाणी व दुर्मिळ सजीवांच्या जाती यांच्यासाठी कायदा करण्यात आला. १९९० मध्ये हा दिवस जागतिक पातळीवर वसुंधरा दिवस म्हणून साजरा होऊ लागला. सन १९९० च्या वसुंधरा दिनामुळे टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या (रिसायकलिंग) विषयाला जागतिक पातळीवर चालना मिळाली. २००० पर्यंत १८४ देशांत हा दिवस साजरा होऊ लागला. आज तर पृथ्वी वरील सर्व मानव जातीला पर्यावरणाचा ऱ्हास, पृथ्वीचे वाढते तापमान, नैसर्गिक संकटे याचे परिणाम भोगावे लागले आहेत, लागत आहेत आणि आता काही तरी ठोस उपाय करण्याची वेळ (कधीच) आली आहे.

   मनुष्याच्या कचरा करण्याच्या आणि अस्वच्छता करण्याच्या प्रवृत्तीचा फटका आपल्या प्राचीन स्थळांना, देवालये, वास्तू, नद्या, समुद्र, गड, टेकड्या, पर्वत, किल्ले, लेणी, जंगले, पशु पक्षी, प्राणी, शहरे, गावे, आणि  मनुष्याला स्वतःला बसतोय. ‘विज्ञान- शाप कि वरदान’ ? या विषयावर शाळेत असताना डोकं लढवून लढवून  निबंध लिहिला होता आम्ही. तो अज्ञानी असताना. मात्र सज्ञान झाल्यावर आम्हाला घरटी प्रत्येकी एक टू व्हीलर घ्यावी लागली. गरज होती ती. ग्लोबल वार्मिंग मुळे तापमान खूप वाढलं, सिमेंटच्या घरांत असह्य होतं,  AC,  कुलर घ्यावाच लागला. गरज होती ती. बँका आणि फायनान्स कंपन्या कर्जाच्या जाहिराती आणि सूट, सहज मिळणारं कर्ज आणि घरापासून लांब असणारी नोकरी व शाळा यासाठी फोर व्हीलर घ्यावीच लागली. गरज होती ती. याच भौतिक गरजा पर्यावरणात असमतोल निर्माण करताहेत. त्यामुळे वायू प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. लोक जिथे जिथे जातात तिथे तिथे बेजबाबदारपणे वागतात. अगदी समुद्रसपाटीपासून उंच असणार्‍या जगातला एव्हरेस्टचा माथासुद्धा सुटला नाही यातून. चीन, अमेरिका व रशियातील गिर्यारोहक तुकड्यांनी तिथला कचरा टनाने खाली आणून त्याची विल्हेवाट लावली.

अधिक वाचा  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 एका जागतिक सर्वेक्षणांनुसार आपल्या पृथ्वीवरची किमान १५ कोटी झाडे दरवर्षी नष्ट होत आहेत. म्हणजे ५६ एकर वरील जंगल एका मिनिटाला नष्ट होत आहेत. हा वेग पाहता भविष्य कसे असेल आपले याचा विचार केलाच पाहिजे. मानवाच्या भौतिक प्रगतीच्या हव्यासापोटी पृथ्वीची काय अवस्था झाली आहे हे वेगवेगळे प्रदूषण पाहिले की लक्षात येते. साधं पाणी म्हंटलं की त्याचे प्रदूषण मानव निर्मित आहे, नद्या, नाले, ओढे, तलाव, समुद्र बघितले की त्यात टाकण्यात येणारं प्रदूषित पाणी, प्लॅस्टिक कचरा, वस्तु आणि आपल्या देशातल्या गणपती, दुर्गा उत्सवात व धार्मिक उत्सवात प्रचंड प्रमाणात टाकण्यात येणारे निर्माल्य आणि विसर्जन होणार्‍या मूर्ति पाणी प्रदूषित करतं.

हवा नैसर्गिक असली तरी तिचे प्रदूषण मानव निर्मितच आहे. रस्त्यावरून धावणारी असंख्य वाहने, औद्योगिक कारखान्यातील धूर यामुळे प्रदूषित होणारी हवा मनुष्यासाठी घातक आहे. जगाच्या पातळीवरचा विचार जाऊ द्या, आपण आपल्या स्थानिक पातळीवर, आपल्यापासून विचार केला पाहिजे. अर्थ डे वर्षातून एक दिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनात रोजच याचा विचार झाला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून प्रत्येकजण खूप काही करू शकतो. हा विषय खूप मोठा आहे. पण पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर या गोष्टी करा.  

इंधनाचा (वाहनांचा) कमीत कमी वापर,

लाकूड, कागद, फर्निचर, कृत्रिम रंग, प्लॅस्टिक यांचा कमीत कमी वापर,

वृक्षारोपण करणे, जंगल तोड कमी करा,

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा योग्य वापर करा,

मंडईत, दुकानात, मॉलमध्ये जाताना आपली स्वत:ची कापडी पिशवी बरोबर न्या, दुकानदार प्लॅस्टिक पिशवी देत असेल तर, ती घेऊ नका,

प्लॅस्टिक बॅग वापरलीच तर ती बाहेर कुठेही न फेकता, पुनर्वापरासाठी (रिसायकल) जमा करा,

लिहिण्यासाठी, मुद्रणासाठी पाठकोरे कागद वापरणे, पेपर नॅपकिन्सचा वापर कमी करा.   

कागदाचा, थर्मोकोलचा (आराशी साठी मखर, पॅकिंगसाठी, खाण्यासाठी डीशेस,ग्लास) वापर कमीत कमीत करावा, कागदाचे उत्पादन करण्यासाठी अनिर्बंध वृक्षतोड होत आहे.

अधिक वाचा  तेजतपस्विनी वंदनीय मावशी केळकर

ओला-सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी नगर पालिकेला मदत करा,

सणावारी पूजेचे निर्माल्य, वस्तु, मूर्ति नदी किंवा समुद्रात टाकू नका, निर्माल्य फक्त कलशातच टाका,

पाणी जपून वापरा, धो धो नळ चालू ठेऊ नका, वापरलेले पाणी झाडाला टाका,

गळके नळ दुरुस्त करून घ्या, पिण्याचे पाणी वाहने धुवायला वापरू नका. 

आटत चाललेल्या नद्या व जल स्त्रोत वाचवा.  

आवाजाचे प्रदूषण थांबवा (सण समारंभावेळी मोठ्या आवाजात गाणी, फटाके फोडणे, मिरवणुकांमध्ये कर्कश गाणी)

आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी रस्त्यावर काहीही फेकण्याची सवय सोडली पाहिजे. असे प्रत्येकाने स्वत:पासून सुरू केले तर आपली पृथ्वी /वसुंधरा मोकळा श्वास घेईल, नुसती तिची /लक्ष्मीची पुजा करून हे साध्य होणार नाही.

संतवाणीत संतश्रेष्ठ तुकारामांनी केलेलं पृथ्वीचं वर्णन बघा,     

                                     वृक्षवल्ली आम्हा सोयरीं वनचरी |

                                         पक्षी ही सुस्वरे आळविती ||

येणे सुखे रुचे एकांताचा वास |

नाही गुण दोष अंगा येत ||    

                                             आकाश मंडप पृथुवी  |

                                            रमे तेथे मन क्रीडा करी ||

कंथा कुमंडलू देह उपचारा |

जाणवितो वारा अवसरू ||

                                    हरिकथा भोजन परवडी विस्तार |

                                          करोनी प्रकार सेवूं रुची ||

तुका म्हणे होय मनासी संवाद |

आपुलाची वाद आपणांसी || – संत तुकाराम    

त्या काळातले निसर्गाच्या सान्निध्याचे वर्णन संत तुकाराम करतात. मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतात. तसंच श्रीसमर्थ रामदासांनी दासबोधामध्ये पण वर्णन केलं आहे की, “पृथ्वी रत्नांची खाण आहे, इथली जीवसृष्टि विविध आहे, झाडे झुडपे, वृक्ष वेली, जीवजंतु याने पृथ्वी नटून गेली आहे. या वृक्षवेलींमध्ये अनेक गुणकारी औषधे आहेत”. जग १९७० ला या बाबतीत जागं झालय, पण वसुंधरेचा विचार आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून आहेच. संतांचं हे चारशे वर्षापूर्वीचे हे वर्णन आहे . आज इतक्या वर्षानी आपण कुठे पोहोचलो आहोत याचा विचार आपण अंतर्मुख होऊन करायला हवा आणि म्हणूनच, सुखाच्या मागे लागलेल्या मानवाला जागृत करण्यासाठीच हा वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तेंव्हा सुख कशाला मानायचं याची व्याख्या प्रत्येकाने करावी, ते ओरबाडून घेऊ नये, समाधानी राहावं. आपल्याला जगविणार्‍या या पृथ्वी देवते/वसुंधरे समोर नतमस्तक व्हावं. तिचा बर्थ डे फक्त २२ एप्रिलला करू नये तो रोज साजरा करावा. तिचं संवर्धन करण्यात आपला वाटा उचलावा, आपल कर्तव्य करावं एव्हढीच कळकळीची विनंती !

  लेखिका –  डॉ. नयना कासखेडीकर  

                    ——————————————————————  

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love