पुणे- पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवार दि. २४ सप्टे. रोजी सायंकाळी केरळ महोत्सव उत्साहात साजरा झाला . यंदा या महोत्सवाचे २६वे वर्ष आहे . केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण व फुकलम(फुलांची रांगोळी) यांनी बालगंधर्व रंगमंदिर सजवले गेले होते. प्रमुख पाहून रेडियो जॉकी संग्राम खोपडे यांचा हस्ते दीपप्रज्वलन करून केरळ महोत्सवाची सुरुवात झाली. याप्रसंगी पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर, को – ऑर्डिनेटर बाबू नायर, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे आदी उपस्थित होते. यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे फेस्टिव्हलमध्ये सलग २६ वर्षे केरळ महोत्सव होत असून त्याबद्दल आनंद व कृतज्ञता पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांच्यामध्ये कला, संस्कृती, नृत्य, गायन याद्वारे प्रेम बंधुत्व वाढविण्याची शिकवण व प्रेरणा पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडींनी आम्हाला दिली त्या बद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
चेंदमेलम, गणेश वंदनम, भरतनाट्यम, शास्त्रीय आणि अर्ध शास्त्रीय नृत्य, गाणी, तिरुवथिरकली लोकनृत्य, मोहिनीअट्टम आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीची ओळख करून देण्यात आली. त्याच बरोबर ओप्पाना (मुस्लिम एथनिक नृत्य) आणि मोर्गमकली (ख्रिश्चन एथनिक नृत्य) या सादर झालेल्या नृत्याविष्कारातून केरळ संस्कृतीतील धार्मिक सलोख्याचे मनोहारी दर्शनही घडविण्यात आले.
पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या 32 संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणारे नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद दिला . या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील २०० हून अधिक केरळी युवक व युवती कलावंत सहभागी झाले होते.
केरळपासून दूर राहणाऱ्या केरळवासीय युवा पिढीला केरळ संस्कृतीचे दर्शन व ओळख यातून प्रभावीपणे झाले तसेच महाराष्ट्रासारखी कर्मभूमी व केरळ सारखी मातृभूमी यांच्यात बंधूभाव वाढावा असाही प्रयत्न यातून केला गेला होता .
समाजातील गरीब, गरजू, अपंगांना पुणे मल्याळी फेडरेशनतर्फे दरवर्षी सातत्याने अर्थसहाय्य व अन्य मदत केली जाते. फेडरेशनतर्फे चर्चेस, ऐयाप्पा मंदिर व मशीदही उभारली असून शाळा व महाविद्यालय देखील संस्थेतर्फे उभारण्यात आली आहेत.
या महोत्सवास पुणे जिल्ह्यातील केरळवासीय मोठे संख्येने उपस्थित होते. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे कमिटी प्रमुख अतुल गोंजारी, मोहन टिल्लू व श्रीकांत कांबळे उपस्थित होते.