पुणे- “श्री सरस्वती ही विद्येची देवता असून तिच्या ज्ञानाचा प्रसार हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारत मातेच्या सीमारेषा ओलांडून संपूर्ण जगभरात पोहोचेल. ज्ञान आणि विज्ञानाच्या एकत्रिकरणाचे हे एकमेव मूर्तिमंत प्रतिक आहे.” असा विश्वास केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडातील बद्रिनाथ धाम येथील माणा गावात उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिरा’मध्ये पवित्र तीर्थक्षेत्रांचे खर्या अर्थाने ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडविण्याच्या, लोकशिक्षणाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत श्रीमद्भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. यामध्ये मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू व जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, सौ. दानवे, सौ.उर्मिला विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड चाटे, लातूर येथील एमआयएमएआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक डॉ.हनुमंत तु. कराड राजेश कराड, ह.भ.प.डॉ.सुदाम महाराज पानेगांवकर आणि डॉ. विजय कुमार दास हे उपस्थित होते.
रावसाहेब दानवे म्हणाले,“मी अनेक राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात जातो. परंतू मला येथे जो आत्मिक आनंद मिळाला त्याचे वर्णन शब्दांत करता येण्यासारखे नाही. विद्येची देवी सरस्वतीचे मंदिर होणे हा एक महत्वाचा क्षण आहे आणि याचा मी साक्षीदार आहे.
डॉ. विश्वनाथ कराड व डॉ विजय भटकर यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी ही अविस्मरणीय घटना आहे. येथे मला जो अध्यात्मिक अनुभव आला, तो माझ्या जीवनाचा आनंदाचा व भाग्याचा क्षण आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ज्ञान विज्ञानाची संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे. त्यामुळेच वेदांमध्ये भाषा, कला, विद्या, ज्ञान आणि विज्ञान यांचा उल्लेख आढळतो. विद्येच्या देवतेची म्हणजेच श्री सरस्वती धाम ज्ञान विज्ञान मंदिराच्या संकल्पनेची पूर्तता होणे ही एक अभूतपूर्व घटना आहे. भारतीय संस्कृती आणि विश्वाची संस्कृती ही वैश्विक असणार आहे. त्यामुळेच भारत विश्वगुरू बनेल. महर्षि वेद व्यास यांनी ज्ञान, विज्ञान, धर्म, कल्पना याचे संपूर्ण ज्ञान मानवजातीसाठी उपलब्ध करुन ठेवले आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ स्वामी विवेकानंद यांनी भाकीत केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. आज श्री सरस्वती मातेचे मंदिर निर्माण केल्यानंतर त्याच्या माध्यमातून आळंदी-देहू-पंढरपूर आणि माणा गावाच नातं जोडलं जाईल. २१ वे शतक हे भारतमातेचे असेल. या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत.”
यावेळी श्री सरस्वती ज्ञान विज्ञान मंदिराच्या उभारणीमध्ये मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिलीप पाटील, गोविंद अलेटी व श्री. कैलास, श्री. मालविया यांचा श्री.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक व स्वागत पर भाषण केले. प्रा.स्वाती कराड यांनी आभार मानले.