विश्वशांतीकडे नेणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


“राजास जी महाली, सौख्ये किती मिळाली”, या कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मला पहिली ओळख झाली.

तुकडोजी महाराजांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकरे असे  होते. त्यांचे गुरु आडकूजी महाराज यांनी त्यांना तुकडोजी हे नाव दिले. तुकड्या म्हणे या शब्दांनी  शेवट होणारे असंख्य अभंग त्यांनी लिहिले.          

★ १९३० मध्ये त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांनी तरुण आणि महिला वर्गात स्वातंत्र्याबद्दल जागृती निर्माण केली. त्यांचे म्हणणे होते की, मुंगी सुध्दा मनात आणले तर हत्तीला जेरीस आणू शकते. मग इंग्रजांना आपण घालवू शकत नाही का? आपल्या भजन-किर्तनातून जनजागृती करुन त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची एक फळीच निर्माण केली होती.

★ कारागृहातून बाहेर आल्यावर त्यांनी समाज सुधार आंदोलन सुरू केले. नागपूर पासून १२०किमी दूर असलेल्या मोझरी गावात त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. तेथे सर्व जाती, धर्म, पंथ, देशी, विदेशी लोकांना प्रवेश दिला जात होता.      

अधिक वाचा  जरांगे पाटलांनी करून दाखवले

★ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष ग्रामीण पुर्ननिर्माणावर केंद्रीत केले होते. खरा भारत खेड्यात आहे. गावाचा विकास हाच भारताचा विकास आहे. ऋग्वेदातील ‘विश्वपुटे ग्रामे अस्मिन्ननातुराम’ या वचनातून बोध घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामगीता लिहीली. गाव सुशिक्षित, सुसंस्कृत, स्वयंपूर्ण व्हावे. देशाच्या गरजा गावाने भागवाव्यात. अंधश्रद्धा, अनावश्यक रुढी-परंपरा, देवभोळेपणा यात लोकांनी अडकून पडूनये यासाठी ते विशेष प्रयत्न करत.

महिला विकास हा सुद्धा त्यांचा प्रमुख मुद्दा होता.

कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या व्यवस्थापनात स्री कशी महत्वाचा वाटा उचलते. हे त्यांनी आपल्या किर्तनातून सांगितले. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली. व्यसनाधिनतेचा तीव्र विरोध केला. देशभक्ती, आत्मसंयम यांचे धडे दिले. व्यायामाचे महत्व सांगणारा ‘आदेश रचना’ हा ग्रंथ लिहिला. तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते निरोगी, बलवान, नीतियुक्त, सुसंस्कृत असले पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता.

अधिक वाचा  आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे - महिलांचा प्रवास प्रगतीकडे..

★ मराठी, हिंदी भाषेतून त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. जवळजवळ ३००० भजने, २००० अभंग, ६०० पेक्षा जास्त लेख त्यांनी लिहिले. सामाजिक, आध्यात्मिक, राष्ट्रीय विषयांवर हे लिखाण आहे. ते आध्यात्मिक क्षेत्रात योगी, सांस्कृतिक क्षेत्रात कवी, व्याख्याता, संगीतज्ञ होते. कीर्तन, अभंग, खंजिरी भजने यातून त्यांनी समाज प्रबोधन केले. राष्ट्रोन्नतीच्या कामात त्यांनी आपले सारे आयुष्य खर्ची घातले. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून सन्मानित केले. त्यांनी जगाला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. स्वतः जवळ असलेल्या स्वानुभूत दृष्टीने, पवित्रतेने जगाकडे पहावे. कोणाचाही द्वेष करु नये. देव मंदिर, मशिद, चर्च अशा वास्तूंत नाही तर सर्वव्यापी आहे. एकाच निराकाराची भक्ती करा. आपले आंतरिक मूल्य आणि सार्वभौमिक सत्य जाणून घ्या.

★ समाजाला आध्यात्मिक मार्गाने विश्वशांतीकडे नेणारे राष्ट्रसंत होते. पंथपरंपरेवर मात करुन परमार्थाचा मार्ग सुकर करणारे संत होते. व्यक्तिगत स्वरुपाची भक्ती समाजाभिमुख करण्याचे सामर्थ्य असणारे आधुनिक समाज पुरुष होते. त्यांचे विचार कृतिप्रधान होते. त्यामुळे ग्रामाकडून देशाकडे व देशांकडून विश्वाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी दाखवला.

अधिक वाचा  दुसऱ्या लाटेचे पहिले फटके

★ सामुहिक प्रार्थना पध्दतीने समाजात प्रेम,बंधूता वाढेल असा त्यांचा दावा होता.  त्यांनी जगाला सांगितले, तुम्ही कोणत्याही धर्माचे असा साऱ्या जगाचा नियंता एकच आहे. प्रार्थनेत हेच सूत्र असले पाहिजे.

सर्वेत्र सुखिनः सन्तु ।

 सर्वे सन्तु निरामयाः ।       

सर्वे भद्राणि पश्यन्तु

। मा कश्चिद् दुःख माप्नुयात् ।।

शेवटी काय सर्व विश्व एकाच सूत्रात बांधले आहे. ते समजून घ्या. आपल्यातून आपल्याला आणि जगालाही ओळखा.

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे।असे जगा.

 परमेश्वर म्हणजे काय तर,

हर देश में तू, हर भेष में तू,

 तेरे नाम अनेक तू एक ही है ।

तुकड्या कहे कोई न और दिखा,

 बस मै और तू सब एकही है।

–  गीताग्रजा ★           

लेखिका- डॉ वैशाली काळे-गलांडे

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love