पुणे–आयुर्वेद पद्धतींना आधुनिक आरोग्य सेवेसह एकत्रित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाने, आयुष मंत्रालयाच्या (उत्तराखंड सरकार) अधिपत्याखाली नुकतेच पुणे स्थित रसायू कॅन्सर क्लिनिक बरोबर सामंजस्य करार केला आहे. या सहकार्याचे उद्दिष्ट उत्तराखंडमधील आयुष मधील सरकारी डॉक्टरांना आयुर्वेद आणि कॅन्सर मध्ये विशेष प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे आहे, जे केवळ रसायुकरिताच नव्हे तर आयुर्वेदाच्या व्यापक क्षेत्रासाठी एक अतुलनीय उपलब्धी आहे.
यानिमित्ताने रसायु कॅन्सर क्लिनिक पुणे येथील आयुर्वेद तज्ञांतर्फे ४ दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये वैद्य योगेश बेंडाळे , वैद्य अविनाश कदम आणि वैद्य प्रियांका शिरोळे हे सहभागी झाले. या कार्यशाळेचे उद्घाटन आयुष आणि आयुष शिक्षण शासन – उत्तराखंड चे सचिव डॉ. पंकज कुमार पांडे यांच्या उपस्थितीत झाले.रसायु ग्रुप पुणेचे अध्यक्ष वैद्य योगेश बेंडाळे- उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.ए.के. त्रिपाठी,कुलसचिव डॉ.अनुप गख्खड , सहाय्यक औषध नियंत्रक डॉ.कृष्ण कुमार पांडे ,उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.अजय गुप्ता ,रसायु गृपच्या संशोधन व शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश कदम यावेळी उपस्थित होते.
सुरक्षित आणि प्रभावी कर्करोग उपचार उपलब्ध करण्याच्या या प्रयत्नात, संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित आयुर्वेदातील तत्त्वे आणि प्रत्यक्ष रुग्णावरील चिकित्सा, संशोधन आणि प्रकाशित शोधनिबंध यांचा परिचय करून देणे हा देखील या सहकार्याचा उद्देश आहे. लवकर निदान झालेल्या कर्करोगाचे महत्त्व ओळखून, हे विशेष प्रशिक्षण या डॉक्टरांना आयुर्वेदिक तत्त्वांचा वापर करून कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रगत ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्यास मदत करू शकेल. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय पद्धतींमधील समन्वयाकरिता हे महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास सचिव डॉ. पंकज पांडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला उत्तराखंड मधील आयुर्वेद वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पंकजकुमार पांडे यांनी यावेळी सांगितले की, रूग्णांच्या हितासाठी विविध औषध प्रणालींमध्ये संघर्ष नसून परस्पर सहकार्य असायला हवे. जागतिक व्यासपीठावर संशोधन आणि प्रकाशन करून आणि या उपक्रमाद्वारे आयुर्वेदाचा प्रसार करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी रसायु कॅन्सर क्लिनिक करत असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. उत्तराखंडमधील डॉक्टर आणि रुग्णांना आयुर्वेदाच्या माध्यमातून कर्करोगावर उपचार करण्याची संधी याद्वारे उपलब्ध झाली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
डॉ. योगेश बेंडाळे यांनी सांगितले की, भारतात कर्करोगाच्या बहुतांश रुग्णांचे निदान अधिक प्रगत अवस्थेत केले जाते त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यात अधिकच अडचणी येतात. अशा रूग्णांमध्ये आयुर्वेद उपचारांमुळे सार्वदेहिक परिणाम सुधारतात आणि रुग्णाचे आयुष्यमान सुधारण्यास वाव मिळतो. या अवस्थांमध्ये आयुर्वेदामध्ये कर्करोगाच्या रूग्णांवर सुरक्षित आणि प्रभावी उपचार देण्याची मोठी क्षमता असल्याचे दिसून येते.
डॉ. ए. के त्रिपाठी यांनी कॅन्सर इम्युनोलॉजीमधील आधुनिक संशोधनावर प्रकाश टाकला आणि आयुर्वेद रसायन थेरपीच्या भूमिकेवर जोर दिला ज्यामध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये परिणाम सुधारण्याची क्षमता आहे , असे सांगितले.
तसेच , उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठ आणि रसायू कॅन्सर क्लिनिक यांच्यातील सहकार्य यामुळे भविष्यातील देखील आयुर्वेद डॉक्टरांना आयुर्वेद ऑन्कोलॉजीमध्ये प्रशिक्षित करून त्यांना संशोधन-आधारित उपचारांचा वापर करण्यास नवी दिशा मिळण्यास मदत होईल.
पुराव्यावर आधारित आयुर्वेद आणि कॅन्सर चिकित्सा याकरिता प्रसिद्ध असलेल्या रसायु कॅन्सर क्लिनिक (आरसीसी) ने या सहकार्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. आरसीसी ला आयुर्वेदामार्फत कर्करोगाच्या रूग्णांवर उपचार करण्याचा २५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. रसायु ने कॅन्सर रुग्णांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आणि प्रगत कर्करोग रुग्णांमध्ये उपचारांकरिता रसायन चिकित्सेवर आधारित विविध उपचार प्रणाली विकसित केल्या आहेत. हे उपचार रुग्णांना सहज घेता येतात तसेच कोणताही वैद्य आपल्या रुग्णांकरिता हे उपचार देशात अथवा जगात यशस्वी पणे वापरू शकतो . याकरिता रसायु ने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगवर आधारित संगणकीय तंत्रज्ञान ( ऑन्कोलॉजी सॉफ्टवेअर ) विकसित केले आहे. यामुळे आरसीसीचा अनुभव आणि कौशल्य कार्यशाळेत उपस्थित असलेल्या डॉक्टरांना दूरस्थपणे कौशल्य विकासाबरोबरच रुग्णांच्या चिकित्सेतील चढ उतार यावर नजर ठेवण्यास देखील मदत करेल. या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत, रसायु कॅन्सर क्लिनिकच्या अनुभवी डॉक्टरांच्या पथकाने त्यांचे अनुभव तथा कौशल्य उत्तराखंडमधील सरकारी आयुर्वेद चिकित्सकांना या व्यापक कार्यशाळेद्वारे दिले. त्याच बरोबर, आयुर्वेद ऑन्कोलॉजीमधील उपचारात्मक, शैक्षणिक आणि संशोधन हेतूंसाठी रसायु कॅन्सर क्लिनिक आणि उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करारावर वर स्वाक्षरी करण्यात आली.
डॉ. योगेश बेंडाळे यांनी सांगितले की, “कर्करोगाशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या संशोधन-आधारित क्षमतेचा उपयोग करण्याच्या आमच्या ध्येयामध्ये ही भागीदारी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैद्य बेंडाळे हे कर्करोग तसेच दुर्धर व्याधींवरील आयुर्वेदीय उपचारांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. अशा अनेक व्याधीकरिता त्यांच्याकडे 40 हून अधिक पेटंट आहेत आणि त्यांचा कर्करोगावरील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग तसेच शोध पत्रिकांमध्ये प्रकाशने देखील आहेत”