आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक

आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक
आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक

अथांग परिश्रम, अलौकिक पराक्रम आणि उत्तुंग कर्तृत्व करून इतिहासाच्या सुवर्ण पानांवर स्वतःचे स्थान निर्माण करणारे अनेक वीर या भारतभूमीत निर्माण झाले. या प्रत्येक महापुरूषांच्या चरित्रात त्यांचे व्यक्तीमत्व त्या काळातील स्थळ-काळ सापेक्ष घटना आणि त्यांचा तात्कालिक तसेच शाश्वत विचार आपल्याला अभ्यासायला मिळत असतो. इतिसातील महापुरुषांच्या जीवनातील रमणीय गोष्टींचा मनोरंजनासाठी उपयोग होत असतो. परंतू यासोबतच त्या महापुरुषांच्या सध्याच्या वर्तमान काळातील परिस्थितीतही जे विचार लागू होतील अशा शाश्वत विचारांना आपण समजून घेतले आणि त्यांचे आचरण केले तर नक्कीच इतिहास लेखनाचे आणि अध्ययनाचे सार्थक होते.

भारतावर ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य नुकतेच प्रस्थापित झाले असताना या बलाढ्य इंग्रजांविरोधात उमाजीराजे नाईकांनी जो लढा दिला तो अद्वितीय असा होता. हा लढा उभा करीत असतांना उमाजीराजेंच्या शब्दासाठी जीव ओवाळून टाकणारी माणसे त्यांना भेटली होती. अनेकांना उमाजीराजेंबद्दल आदर होता. ते हयात असतानाही त्यांचे पराक्रम घरोघरी सांगितले जात होते. या सर्वांना कारण म्हणजे उमाजीराजेंचे थोर चारित्र्य आणि इतरांविषयी त्यांची वागणूक.   उमाजीराजेंच्या जीवनातील अनेक वेगवेगळे प्रसंग त्यांच्या थोर व्यक्तीमत्वाचे दर्शन घडवतात.

रामोशी समाज

रामोशी ही महाराष्ट्रातील वन्य जमातींपैकी एक जमात.  रामोशी हा शब्द ‘रामवंशी’ या शब्दापासून अपभ्रंशाने निर्माण झालेला आहे. रामवंशी म्हणजेच रामाच्या वंशाचे. वनवासात असताना भगवान श्रीरामाचा अनुग्रह या समाजाला लाभला होता म्हणून हा समाज स्वतःला ‘रामवंशी’ म्हणू लागला असे मानले जाते. रामोशी म्हणजे ‘रानवशी’ असा देखील याचा अर्थ सांगितला जातो. रानात राहतात म्हणून रानवशी असा त्याचा अर्थ आहे. एकोणाविसाव्या शतकाच्या प्रारंभी रामोशांची संख्या एकंदर १८००० एवढी होती.

रामोशांच्या रक्तातच शौर्य, पराक्रम, बेडरपणा ठासून भरलेला होता. स्वामीसेवेसाठी आणि रक्षणासाठी प्रसंगी प्राणांचीही पर्वा न करणारा हा समाज होता. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे अनेक जबाबदारीचे कार्य रामोशांना दिले होते. शारीरिक सामर्थ्याचे धनी असलेले रामोशी प्रामाणिक होते तसेच हेरगिरी करण्यात, किल्ल्यांचे रक्षण करण्यात, मर्दुमकी गाजवण्यात  पटाईत होते. शिवरायांनी रामोशांना हेरखात्याची आणि गडकिल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती.स्वराज्याच्या गुप्तहेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे सुद्धा रामोशी समाजाचेच होते.

हिंदवी स्वराज्यात रामोशी समाजाला शिवरायांनी त्यांच्या पराक्रमाचे बक्षिस म्हणून त्यांना काही ठिकाणी इनामे आणि वतने उपजिविकेची साधने  म्हणून करून दिली होती. यातीलच पुरंदर किल्ल्याची व्यवस्था तेथील रामोशी समाज शिवरायांच्या काळापासून करत होता. पुरंदरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले वतन रामोशांना मिळाले होते. स्वबळावर, मेहनतीवर जगणाऱ्या या समाजाचे वाईट दिवस मात्र पेशवा दुसरा बाजीरावच्या कार्यकाळात सुरू झाले. इ.स. १८१८ साली मराठ्यांची सत्ता निर्विवादपणे संपली आणि इंग्रजांचा अंमल सुरू झाला याकाळापासून तर रामोशांचे जीवन अतिशय खडतर झाले. आपल्या जीवनाचे साधन नष्ट होतांना बघून आणि मातृभूमी गुलामगिरीच्या पाशात ओढली गेलेली बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी चेतविलेला स्फुल्लिंग रामोशांच्या मनात पुन्हा धगधगू लागला आणि म्हणून रामोशांनी पुढे बलाढ्य परकीय जुलमी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले.

भारतावर राज्य प्रस्थापित करत असतांना ते टिकविण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्याच्या क्रांतीची ज्वाळा प्रज्वलित करणाऱ्या अनेक महापुरूषांना आणि इंग्रजांविरोधात उठाव करणाऱ्या  वेगवेगळ्या जमातींना दरोडेखोरीचा बट्टा लावला आहे.  रामोशांनी आपल्या हक्कांसाठी, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूद्ध मोठे उठाव केले आणि म्हणूनच रामोशांविरूद्धच्या द्वेषापायी इंग्रजांनी या जमातीलाही  १२ अॉक्टोबर १८७१ ला लागू करण्यात आलेल्या ‘गुन्हेगार जमाती कायदा १८७१’ अंतर्गत गुन्हेगार जमातीचा शिक्का लावला. प्रत्येक रामोशी हा जन्मतःच गुन्हेगार असतो हे इंग्रजांनी सांगितले आणि आज हा कायदा नसताना सुद्धा आजपर्यंत आपणही तेच समजतो आहे. परंतू शिवछत्रपतींच्या काळात अत्यंत इमाने इतबारे स्वराज्याची सेवा करणारी, मर्दुमकी गाजवणारी, स्वतःचे प्राण देऊन गडकिल्ल्यांचे रक्षण करणारी, स्वराज्याचे अत्यंत महत्त्वाचे हेरखाते सांभाळत स्वराज्य अजिंक्य करणारी  ही जमात अचानक दरोडेखोरी का करायला लागली आणि व्यसनाच्या आहारी का गेली याचा सारासार विचार आज व्हायला पाहिजे. हा विचार झाल्यावर इंग्रजांचा अन्याय, कटकारस्थान आणि त्याचा समाजावर पडलेला जातीभेदाचा दुर्दैवी परिणाम आपल्या लक्षात येईल.

भारतातील मोठमोठे संस्थानिक राजे आणि बलाढ्य नामवंत सरदार  इंग्रजांचे मांडलिक झाले होते. अशावेळी आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी रामोशी समाजाला एकसंध करून उमाजी राजे नाईकांनी सर्वात आधी इंग्रजांविरूद्ध सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला.  ‘आम्ही बंडखोर आहोत, दरोडेखोर नाही’ हे उमाजींनी सर्व जगाला दाखवून दिले.

अधिक वाचा  टीव्हीएस मोटर कंपनीने (टीव्हीएसएम) केली टीव्हीएस ज्युपिटर ११० लाँच : ड्युएल हेल्मेट अंडर- सीट स्टोअरेज, इंधन भरण्याची सोय पुढील बाजूस आणि प्रशस्त फ्लोअर बोर्ड

उमाजींचा जन्म रामोशी समाजातील खोमणे नावाच्या कुटुंबात पुण्यापासून जवळ भिवडी, किल्ले पुरंदर या ठिकाणी  इ.स. ७ सप्टेंबर १७९१ या रोजी झाला. उमाजींच्या आईचे नाव लक्ष्मीबाई खोमणे आणि पित्याचे नाव दादजी नाईक खोमणे असे होते. उमाजींना अंदोजी, अमृता आणि कृष्णाजी हे तीन सख्खे भाऊ होते. तर सयाजी, मालजी आणि बहिर्जी हे तीन सावत्र भाऊ होते.  बालपणापासूनच उमाजी अत्यंत चपळ, शरीराने मजबूत, बुद्धिने तल्लख आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य असणारे होता. उमाजींना लहानपणापासून कुस्ती-मल्लविद्या आणि व्यायामाची आवड होती यामुळे त्यांचे शरीर बळकट आणि पिळदार झाले होते. उमाजींमध्ये उपजतच सर्वांचे नेतृत्व करण्याचा गुण होता.  उमाजींना लहानपणापासूनच तलवार, भाला, तीरकामठे, दांडपट्टा, गोफण चालवण्याची कला शिकवण्यात आली आणि अत्यंत कमी वयात त्याने या सर्व कला अवगत केल्या. उमाजी ११ वर्षांचा असतानाच त्याचे लग्न ५ वर्षाच्या गंगाबाईशी करण्यात आले.

उमाजी अवघे ११ वर्षांचे असतांना त्यांचे पितृछत्र हरपले. इ.स. १८०२ साली दादजी खोमणेंचा मृत्यू झाला. उमाजीवर मुख्यत्वे त्यांच्या आईने संस्कार केले. लक्ष्मीबाई लहान उमाजीला छत्रपती शिवरायांच्या कथा सांगायच्या. ‘शिवाजी महाराजांचे बालपणीचे खेळ, त्यांची सवंगड्यांसोबत लुटुपुटूची लढाई, त्यातून होणारा स्वराज्याचा संस्कार, आणि याच संस्कारातून घडून शिवाजी महाराजांनी मोठं झाल्यावर गडकिल्ले जिंकून निर्माण केलेलं रयतेच्या हिताचे स्वराज्य, या स्वराज्यावर अनेक संकटे आली तरी त्यांचा सामना शिवरायांनी शौर्याने कसा केला, रयतेला स्वराज्यात काडीचाही त्रास कसा नव्हता, स्वराज्यात शत्रूपक्षातील का असेना परस्त्रीला माता-भगिणी मानत…’  या सर्व गोष्टी ऐकून उमाजींच्या बालमनावर शिवरायांच्या शौर्य आणि चारित्र्याचा उत्तम संस्कार होत होता. ज्याप्रमाणे जिजामातेने शिवरायांवर राष्ट्रभक्तीचे संस्कार केले तसेच तेजस्वी संस्कार लक्ष्मीबाईंनी उमाजींवर केले.

उमाजीराजे ‘एक थोर व्यक्तीमत्व’

उमाजीराजेंची जडणघडण होत असतांना त्यांच्यावर त्यांच्या आई लक्ष्मीबाईने उच्च आदर्शांचे संस्कार केले होते. आईच्या संस्कारांची शिदोरी पाठीशी घेऊन उमाजीराजे आपले जीवन जगत होते. दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या संस्कारांनीच त्यांना विचार करायला भाग पाडले. ‘ज्या दारूच्या व्यसनामुळे आप्तस्वकिय दुखावले जातात, आपला अपमान होतो, जीवनात लाचारी येते अशा व्यसनाला लाथ मारली पाहिजे’ असा विचार करून उमाजीराजेंनी एका क्षणात व्यसन सोडले होते. संपूर्ण आयुष्य उमाजीराजे निर्व्यसनी राहिले. उमाजीराजेंचा हा दृढनिर्धार आजही अनेकांना खुप काही शिकवून जातो. उमाजीराजेंनी आजच्या दोनशे वर्षांपूर्वीच शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. तुरूंगात कैद असतांना शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करून उमाजीराजेंनी इंग्रजांनाही आश्चर्यचकित  केले होते.

आईच्या संस्कारांनी वाढलेल्या उमाजीराजेंचे वैयक्तिक चारित्र्य अतिशय स्वच्छ होते. त्या काळात एकापेक्षा जास्त स्त्रियांना पत्नी म्हणून स्वीकारणे अथवा विवाहबाह्य संबंध प्रस्थापित  करणे हे मोठमोठ्या लोकांना काही गैर नव्हते. अशावेळी उमाजीराजेंनी एकपत्नी व्रत आजन्म पाळले. एखाद्या ठिकाणी छापा मारल्यावर जर तेथे कुणी महिला आढळल्या तर त्यांचा माताभगिणीप्रमाणे उमाजीराजेंनी सन्मान केला. आपल्या टोळीतील इतर साथीदारांनाही परस्त्री बद्दल आदराची भावना ठेवायला उमाजीराजे सांगायचे. एका स्त्री बाबतीत गैरवर्तन केल्यामुळे अमृताची म्हणजेच स्वतःच्या सख्या भावाची उमाजीराजेंनी कान उघाडणी केली होती. असा स्वच्छ चारित्र्यवान नेता लाभला म्हणून सर्व साथीदारांचा उमाजीराजेंवर विश्वास होता.

उमाजीराजे जेजूरीच्या खंडोबाचे भक्त होते आणि त्यांच्या दातृत्वामुळे ते जेजूरी आणि आसपासच्या भागात खुप प्रसिद्ध झाले होते. जेजूरीला भिक्षा मागणारे लोक, साधू , बैरागी लोक उमाजीराजेंची गाथा गात असत. उमाजीराजेंनी स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीपैकी बहुतेक संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करून टाकली होती. जेजूरीचा खंडोबा तसेच इतरही मंदिरांना त्यांनी दान-दक्षिणा दिल्या होत्या. गरीबांच्या झोळीत अंगावरील गोष्टी ओतताना त्यांना अनेकांनी पाहिले होते. अतिउदार स्वभावामुळे उमाजीराजेंना पत्नीचे बोल ऐकावे लागायचे परंतू संत तुकारामांसारखे वैराग्य या बाबतीत उमाजीराजांचे होते.

उमाजी राजेंचे ‘प्रतिसरकार

इंग्रजांनी रामजी बिन कावजी पाटील  नावाच्या उमाजीराजेंच्या गुप्तहेराला अटक केली होती. इंग्रजांनी रामजी कडून दोन जबान्या लिहून घेतल्या. पहिली जबानी लिहून घेत असताना सर्व प्रश्न विचारून झाल्यावर “तुला आणखी काही सांगायचे आहे का?”  असे रामजीला विचारण्यात आले. रामजीने उत्तर दिले की, ” मला उमाजीराजेंनी सांगितले आहे की जर तुला इंग्रजांनी अटक केली तर तू त्यांना सांगावे की आमच्या राजाने बंड केले आहे म्हणून आम्ही गावोगावी सारा वसूल करतो. चोरी करणे,  दरोडा टाकणे असे काम आम्ही करीत नाही.”

अधिक वाचा  मनाची श्रीमंती...

उमाजी राजेंनी इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी सैन्य वाढवायला सुरूवात केली होती. सैन्याचा खर्च भागविण्यासाठी  आणि कंपनी सरकार विरूद्ध असलेला हा क्रांतीचा लढा सुरू ठेवण्यासाठी पैशांची गरज होती. खजिना नसेल तर राज्य टिकत नाही.  हा खजिना राज्यातील लोकांकडून कर स्वरूपात घेतला जातो तसेच शत्रूच्या खजिन्याची लूट करून मिळवला जातो.  उमाजी राजेंनी या दोन्ही मार्गांचा अवलंब केला. इंग्रजधार्जिणे व्यापारी, जहागीरदार, संस्थानिक इत्यादींवर छापा घालून उमाजी राजेंनी त्यांना लुटले. रयतेचे शोषण करून जमवलेल्या पैशांनी मोठे झालेले शेठ उमाजी राजेंच्या नजरेतून सुटले नाहीत.

शेतसारा (कर) वसूल करणे हा सरकारचा अधिकार असतो, त्या बदल्यात सरकार लोकांना संरक्षण आणि सुविधा देत असते. त्याकाळी गावातील पाटील, कुलकर्णी गावातून शेतसारा गोळा करायचे आणि तो इंग्रज सरकारला पाठवायचे. ‘हा शेतसाऱ्याचा संपूर्ण वसूल आमच्याकडे जमा करावा’ असे उमाजी राजेंनी फर्मान काढले. या फर्मानात असे होते की, “गावाच्या प्रमुख व्यक्तीने गाव साऱ्यातून काही भाग टोळीला द्यावा. जर हा वसूल आपल्याला न देता इंग्रजांना दिला तर त्याच्या कंबरेला दगड बांधून उभे राहण्याची शिक्षा देण्यात येईल. कोणत्याच प्रकारची दया कुणावरही दाखवली जाणार नाही. या फर्मानाला जर कुणी विरोध केला तर त्याला ठार मारण्यात येईल आणि त्यांचे घर जाळण्यात येईल.” बलाढ्य इंग्रज सरकार विरूद्ध हे फर्मान काढणे आणि त्याची अंमलबजावनी करणे खरोखर खूप हिमतीचे काम होते.

उमाजी राजेंनी जिल्ह्याचे मुख्य ठाणे असलेल्या सासवड गावातील पाटलाला खंड पावती पाठविली होती. या पावतीत मजकूर असा होता की, ” आपल्या सासवड गावावर सहा हजार रूपये खंड ठरविण्यात आला आहे. तो खंड लगेच गोळा करून अनामत रक्कम ठेवावी. सरकारी मामलेदाराला तुम्ही वसुली बिलकुल करू देऊ नका. जर तुम्ही इंग्रजांना एक पैसा जरी दिला, तर तुम्हा गावकऱ्यांना खूप कडक शासन आम्ही करू. सर्व गावाला आग लावून त्याची राखरांगोळी करण्यात येईल. हे लक्षात ठेऊन लवकरात लवकर पैसा गोळा करून तयार ठेवावा, हे सर्वांना जाहीरपणे सांगण्यात येत आहे.”

उमाजी राजेंनी पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सर्व गावातून जवळपास १३,७८४ रूपये इतकी खंडणी मागितली होती. यापैकी ५००० रूपये त्यांनी वसूल केले होते. साताऱ्याच्या उत्तरेकडील सीमेवरील आणि जिल्ह्यातील पंत सचिवांकडूनही उमाजींनी खंडणी आकारली होती. खंडाप्रमाणे रामोशांच्या टोळीला लागेल तेव्हा अन्न-पाणी गावकऱ्यांनी पुरवावे असे उमाजी राजेंनी हुकूम  काढले होते.

उमाजीराजेंनी इंग्रजांना सांगितले होते की आता आम्ही स्वतंत्र राज्यकर्ते आहोत. उमाजीराजेंनी इंग्रजांच्या विरोधात ‘प्रतिसरकार’ स्थापन करून तशी घोषणाच केली होती.  राजा जसा महसूल वसूलीचे काम करतो तसेच उमाजीराजे करीत होते. एखाद्या गावाने जर वसूल नाही दिला तर एखाद्या राजाने जे केले असते तेच उमाजीराजेंनी केले, त्यांनी अशा गावातून जबरदस्तीने वसूल गोळा केला आणि जास्त विरोधात जाणाऱ्या गावांची राखरांगोळी केली. उमाजीराजेंनी दरोडेखोरीचा त्यांच्यावर इंग्रजांनी केलेला आरोप असा फेटाळून लावला होता आणि “आम्ही बंडखोर आहोत, दरोडेखोर नाही” हे इंग्रजांना ठणकावून सांगितले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांकडून स्वराज्याची प्रेरणा

उमाजीराजेंना कॅप्टन  मॉकिंटॉश या  इंग्रज अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पकडण्यात आले होते आणि पुढे याच अधिकाऱ्याने उमाजीराजेंवर आधारित पुस्तक लिहिले. कॅप्टनमॉकिंटॉश त्याच्या पुस्तकात नोंद करतो की, ” उमाजीची साम्राज्य मिळविण्याची महत्त्वाकांक्षा होती. मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लक्षात ठेवून तो त्याचे काम करीत होता.” याचाच अर्थ उमाजीराजेंनी जे प्रतिसरकार स्थापन केले होते आणि स्वतःला राजा म्हणून घोषित केले होते यामागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा होती. छत्रपती शिवरायांसारखे आपणही आपल्या या साथीदारांना एकत्र करून  स्वतःचे स्वराज्य निर्माण करू शकतो असा उमाजीराजेंना विश्वास होता.

उमाजीराजेंमध्ये उत्कृष्ट संघटन कौशल्य होते आणि म्हणून त्यांनी अनेक लोकांना कंपनी सरकार विरोधात एकत्र केले होते. वेगवेगळ्या संस्थानिक आणि वतनदारांना उमाजीराजेंनी इंग्रजांविरोधात आवाहन केले परंतू त्यांना त्यांची साथ मिळाली नाही. परंतू ते खचले नाही, आपण शिवरायांसारखे शून्यातून स्वराज्य निर्माण करू असा उमाजीराजेंना ठाम विश्वास होता. शिवरायांनी ज्या गनिमी काव्याने शत्रूंना नेस्तनाबूत केले होते तो गनिमी कावा वापरून उमाजीराजे इंग्रजांना हैरान करीत होते. आपले स्वराज्याचे ध्येय गाठताना कधी कधी वाईट वेळ आली तर चार पावले मागे घेऊन पुन्हा नव्या दमाने लढण्यासाठी सिद्ध राहण्याची नीती सुद्धा उमाजीराजेंनी शिवरायांकडून आत्मसात केली होती.

अधिक वाचा  व्यथा-वेदना जगणारा व मांडणारा थोर साहित्यिक – अण्णाभाऊ साठे

छत्रपती शिवाजी महाराज रयतेची काळजी घ्यायचे आणि म्हणून त्यांनी १३ मे १६७१ साली त्यांच्या आधिकाऱ्याला बजावून सांगितले होते की, “कुठल्याही परिस्थितीत सामान्य लोकांवर जुलूम जबरदस्ती करू नये. रयतेस काडीचा आजार द्यावयाची गरज नाही.” यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. उमाजीराजेंनीही याच आशयाचे उद्गार त्यांनी ६ फेब्रुवारी १८३१ रोजी पाठविलेल्या पत्रात आहे. ते या पत्रात म्हणतात की, ” गावगन्ना रयेत लोकास उपद्रव देऊ नये, फक्त पोटास सरंजाम घेत जावा.”  यावरून सामान्य लोकांविषयीचा शिवरायांचा दृष्टीकोन  उमाजीराजेंनी आचरणात आणला होता हे दिसून येते. छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचे आचरण करून परकीय सत्तेशी लढणारे उमाजीराजे म्हणजेच त्या काळातील ‘प्रतिशिवाजी’ होते, हे इंग्रजांनीसुद्धा मान्य केलं आहे.

उमाजीराजेंचे भारतीय इतिहासातील योगदान

कंपनी सरकारच्या जुलमी राजवटीविरूद्ध रामोशांचे बंड उमाजी राजेंनी उभारले. हे बंड फक्त स्वतःच्या वतनासाठी अथवा स्वार्थासाठी नव्हते. उमाजीराजेंना इंग्रजांनी स्वतःच्या नोकरीत ठेवले असताना त्यांना एक चांगले वेतन दिले जायचे. पुढे नजरकैदेत असताना त्यांना कुठल्याच प्रकारचे काम न करता पेंशन म्हणून खुप पैसा मिळणार होता. उमाजीराजे ऐषआरामात आपले आयुष्य जगू शकले असते. परंतू इतर संस्थानिक आणि वतनदारांसारखे इंग्रजांच्या पेंशनवर जगणे त्यांना मान्य नव्हते. सुखसोयींचे आयुष्य सोडून उमाजीराजेंनी आपल्या मातृभूमीला मुक्त करण्याचा पवित्र आणि खडतर मार्ग निवडला. या मार्गावर चालत असताना त्यांनी अनेक संकटांचा सामना केला.

इंग्रजांनी उमाजीराजेंना पकडण्यासाठी ठिकठिकाणी १५२ चौक्या बसविल्या होत्या. लष्कराच्या वेगवेगळ्या रेजिमेंट आणि पुष्कळ सैन्य उमाजींना पकडण्यासाठी इंग्रजांनी पाठवले होते. सुरूवातीला त्यांच्यावर ठेवलेले १०० रूपयांचे बक्षिस हळूहळू वाढत जाऊन १०००० रू. झाले. या शंभर पट झालेल्या बक्षिसाच्या रक्कम सोबत पुढे ४०० बिघे जमीनही इनाम म्हणून ठेवण्यात आली. उमाजीराजेंना पकडण्यासाठी जागोजागी लष्करी तुकड्या इंग्रजांनी पाठवल्या होत्या. उमाजीराजेंना पकडण्याचे इंग्रजांचे एवढे प्रयत्न,  उमाजीराजे इंग्रजांसमोर किती मोठे आव्हान निर्माण करीत होते हे दाखवून देतात.

१६ फेब्रुवारी १८३१ या दिवशी उमाजीराजेंनी काढलेला ब्रिटिश साम्राज्या विरोधातील जाहीरनामा हा उमाजीराजेंच्या विचारांची व्याप्ती आणि त्यांचा स्वातंत्र्याविषयीचा दृष्टीकोन किती व्यापक होता हे दर्शवतो. हा जाहीरनामा संपूर्ण हिंदुस्थानच्या जनतेसाठी होता. इंग्रजांना कुणीच सहकार्य करू नये असे शत्रू विरूद्ध ‘असहकाराचे’ शस्त्रही उमाजीराजेंनी त्याचवेळी लोकांना दिले होते. ‘सर्वांनी एकत्र येऊन एकाचवेळी इंग्रजांशी लढा द्यावा आणि इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावावे’ असा क्रांतिकारी विचार उमाजीराजेंनी त्याकाळात सर्वात आधी दिलेला दिसतो. त्या काळातील अनेक मर्यादांमुळे हा जाहीरनामा प्रत्यक्ष कृतीत येऊ शकला नाही. परंतू या जाहीरनाम्याने भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्याला एक दिशा मिळाली.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उमाजीराजेंचे योगदान खुप महत्वाचे होते. उमाजीराजेंच्या देशव्यापी क्रांतीच्या विचाराने अनेकांना प्रेरित केले होते. उमाजीराजेंच्या बलिदानानंतर त्यांच्या तुका व म्हांकाळ या दोन मुलांनी इंग्रजांविरोधात आपला लढा चालू ठेवला.  सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर चालणाऱ्या अनेक क्रांतिकारकांचे उमाजीराजे हे प्रेरणास्थान होते. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या ३० वर्षापूर्वीच उमाजीराजेंनी इंग्रजांविरूद्ध सशस्त्रक्रांतीचा लढा उभा केला होता. इंग्रजांसमोर हतबल होऊन नतमस्तक झालेले संस्थानिक व भयभीत जनता यांच्यात उमाजीराजेंनी इंग्रजांविरोधात उभे राहून लढण्याचा आत्मविश्वास निर्माण केला. अतिशय बिकट परिस्थितीतून उभे राहत जगातील सर्वात मोठ्या सत्तेला आव्हान देणारे उमाजीराजे आजही आपल्याला प्रेरणा देतात. उमाजीराजेंनी आपल्या देशाला परकियांपासून मुक्त करण्याचे स्वप्न पाहिले आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यासाठी लढत राहिले. भारताला इंग्रजांविरोधात सशस्त्र क्रांतीचा मार्ग दाखवणारे आणि त्यावरून स्वतः चालून बलिदानाच्या यज्ञकुंडात स्वतःच्या आयुष्याची समिधा अर्पण करणारे उमाजीराजे नाईक हे ‘आद्यक्रांतिकारक’ होते.

© प्रविण प्रल्हाद नायसे

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love