दुरदर्शनचा भारदस्त आवाज हरपला


मुंबई-आपल्या भारदस्त आवाजाने दूरदर्शनवरील नमस्कार, ‘आजच्या ठळक बातम्या’ अशी मराठी बातम्यांची सुरुवात करणारे जेष्ठ वृत्त निवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. त्यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजता पारशीवाडी अंधेरी पूर्व या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दूरदर्शन सह्याद्रीवरील संध्याकाळच्या बातम्या आणि त्याचं निवेदन करणारे प्रदीप भिडे त्या काळात लोकांच्या गळ्यातले ताईत बनले होते. ते ६५ वर्षांचे होते. गेली तीन वर्ष प्रदीप भिडे आजारी होते. ते अंथरुणाला खिळून होते.

एक हसता खेळता चेहरा मात्र बातम्यांच्या जगातला एक गंभीर आवाज म्हणून प्रदीप भिडे यांच्याकेड पाहिलं गेलं. आपल्या बातम्या सांगण्याच्या खास शैलीमुळे प्रदीप भिडे आणि दूरदर्शन हे एक अतूट नातं निर्माण झालं होतं. प्रदीप भिडे यांनी अनेक डॉक्युमेंटरीसाठी आपला आवाजही दिला होता. मराठी इंडस्ट्रीत अजित भुरे आणि प्रदीप भिडे यांच्या आवाजाचा बोलबाला होता.

अधिक वाचा  ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’: प्रदीप भिडे यांच्या या वृत्तनिवेदनाला मिळाली होती दाद ..

प्रदीप भिडे यांनी सुरवातीला काही काळ ‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून नोकरी केली. अलीकडच्या काळातील चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या येण्यापूर्वी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम होते. त्यावेळी प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात आपली खास ठसा उमटवला. १९७२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा दूरदर्शनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदकाचे काम केले. देशातील आणि राज्यभरातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी प्रदीप भिडे यांनी केलेले वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

खार येथे प्रदीप भिडे यांचा प्रियंका स्टुडिओ आहे. प्रदीप भिडे यांनी पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपटांना ‘आवाज’ दिला. तर आपल्या कारकीर्दित दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून पुढील सात-आठ वर्षे सूत्रसंचालनाचे कामही प्रदीप भिडे यांनीच केले. त्यावेळी त्यांना ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही मिळाला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love