पुणे-टाळ मृदंगाचा अखंड गजर…भगव्या पताकांची फडफड…विणेचा झंकार…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् मागील दोन वर्षे विठ्ठल दर्शनापासून अंतरल्याने विठुरायाच्या भेटीची लागलेली आस…अशा भक्तीच्या कल्लोळात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीने सोमवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव |
तेथे नांदे देव | पांडुरंग ।।
अशा शब्दांत ज्या देहूचे माहात्म्य वर्णिले जाते, तेथे संत तुकाराम महाराजांच्या 337 व्या पालखी प्रस्थान सोहळय़ासाठी जणू भक्तीचा महापूरच लोटलेला. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षे पांडुरंगाच्या दर्शनापासून दुरावलेल्या लाखो वारकर्यांनी प्रस्थानाचा हा सोहळा ‘याची देहि याची डोळा’ अनुभवण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपर्यातील लाखो भाविक देहूत इंद्रायणीकाठी एकवटलेले. भक्तीच्या या वर्षावात अवघी देहुनगरी न्हाऊन गेली.
भल्या पहाटे घंटानादाने देहू गाव जागा झाला. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली नि अवघे वातावरण प्रसन्न होऊन गेले. पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा करण्यात आली. साडेपाचला संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात, तर सहाला वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा झाली. सकाळी सातला पालखी सोहळय़ाचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजेचा विधी पार पडला. सकाळी ९ ते ११ दरम्यान इनामदारवाडय़ात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्याने भक्तीचा दरवळ सर्वत्र भरून राहिला. त्यानंतर सकाळी 10 ते 12 दरम्यान रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन झाले. या कीर्तनात सारे भाविकजन दंगून गेले.
दुपारी अडीचच्या सुमारास इनामदारवाडय़ातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाडय़ातील भजनी मंडपात वाजतगाजत आणण्यात आल्या आणि पालखी प्रस्थान सोहळय़ाच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा अजित पवार, आमदार रोहित पवार, सुनील शेळके यांच्या हस्ते पादुकांचा पूजाविधी पार पडला. फुलांनी सजविलेल्या पालखीत पादुका ठेवताच सारा सोहळाच तेजोमय होऊन गेला. देवस्थानच्या वतीने मानकरी, वीणेकरी, फडकरी यांचा सत्कार करण्यात आला. तोवर सारे वातावरण भारून गेले होते. पावणे चारच्या सुमारास पालखी खांद्यावर उचलून भजनी मंडपातून बाहेर आणताच वारकर्यांच्या उत्साहाला उधाण आले. टाळ-मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. दिंडयामधील भाविक फुगडय़ात दंगले. नाचू, डौलू लागले. देऊळवाडय़ातील पिंपळवृक्षाची पानेही जणू या सुरांशी समरस होत सळसळू लागली. वरुणराजानेही हलकासा जलाभिषेक केला. इंद्रायणीच्या डोहात आनंदाचे तरंग उमटले. सारा आसमंतच या सोहळय़ात रंगून गेला.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देऊळवाडय़ात एक प्रदक्षिणा पूर्ण करून महाद्वारातून पालखी महाराजांच्या जन्मस्थळ मंदिराकडे निघाली. पालखी खांद्यावर घेऊन नाचवण्यात आली. पुंडलीक वरदा…तुकाराम…तुकाराम…असा जयघोष झाला. शंख, नगार्याच्या गजराने देहुनगरी दुमदुमून गेली. भक्तिरसात चिंब झालेल्या वारकर्यांनी सुखसमृद्धी आणि पावसाचे मागणे मागितले. भक्तिमय वातावरणात मुख्य देऊळवाडय़ातून पालखी सोहळा इनामदारवाडय़ाकडे मार्गस्थ झाला. पालखीच्या पुढे मानाचे अश्व होते. चांदीची अदागिरी व गरुड टक्का शोभा वाढवत होता. सायंकाळी पालखी आजोळघरी इनामदारवाडय़ात मुक्कामी पोहोचली. त्याठिकाणी समाजआरती झाली. रात्रभर अवघी देहुनगरी भजन कीर्तनात रंगली. मंगळवारी सकाळी सोहळा आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे. येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा मुक्काम असेल.