पुणे–नैसर्गिकदृष्ट्या महाराष्ट्राला जी देणगी मिळाली आहे याचा पर्यटन वाढविण्यासाठी कसा उपयोग होऊ शकेल यावर आता विचार व्हायला हवा. नजीकच्या भविष्यात पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देता येऊ शकतो, मात्र त्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांविषयी परदेशी नागरिकांना माहिती मिळण्याबरोबरच राज्यासाठी सर्वसमावेशक पर्यटन धोरण असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
‘अनफिल्टर्ड कॉन्व्हरसेशन विथ देवयानी पवार’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी देवयानी पवार यांच्याशी संवाद साधत विविध विषयावर आपली मते व्यक्त केली. पुणे स्थित देवयानी पवार या पॉडकास्टर आणि फिल्म मेकर आहेत. राज्यातील तरुणांना विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविलेल्या तडफदार व्यक्तीमत्त्वांचे विचार जाणून घेता यावेत, त्यांच्या अनुभवातून प्रेरणा मिळावी, त्यांच्याशी संवाद साधता यावा या उद्देशाने देवयानी पवार यांनी पुढाकार घेत सदर कार्यक्रम सुरू केला आहे.
या कार्यक्रमाच्या सातव्या सत्रात बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “कोरोनानंतरच्या काळात रोजगारनिर्मितीचा सर्वांत मोठा प्रश्न आपल्या समोर असणार आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास आपल्याकडे असलेले नैसर्गिक सौंदर्य, जंगले, प्राणीसंग्रहालये, पारंपारिक खाद्यसंस्कृती यामुळे रोजगार निर्मितीसाठी सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे. याचा गांभीर्याने विचार करीत सर्वसमावेशक धोरण राबविणे गरजेचे आहे.”
हे करीत असताना डिजिटल व सामाजिक माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण ठरेल. हॉटेल्स, होम स्टे यांची संख्या वाढवीत असताना ती सांभाळणा-या मनुष्यबळाला सरकारी मदत, प्रशिक्षण व आदरातिथ्य विषयांसंबंधीचे शिक्षण दिल्यास त्याचा उपयोग निश्चितच पर्यटनवृद्धीस होऊ शकेल, असेही ठाकरे यांनी नमूद केले.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाठांतरे किंवा पुस्तकी शिक्षणावर पूर्ण भर देण्यापेक्षा व्यावहारिक शिक्षणाचा आंतरभाव अभ्यासक्रमात असायला हवा. संशोधन आणि व्यक्तीमत्त्व विकास शिक्षणावर भर देणे आजच्या काळात महत्त्वाचे आहे. खेळांबरोबरच मुलांचे मानसिक आरोग्य व त्यांना शाळेमध्ये मिळणा-या आवश्यक सोयीसुविधा यांकडे स्थानिक स्वराज्य संस्थांनी लक्ष द्यायला हवे. याशिवाय मुलांमध्ये असलेल्या निर्भयतेला सामाजिक आयाम देत एक चांगला नागरिक म्हणून त्यांची जडणघडण महत्त्वाची ठरेल.
लिंग समानतेवर आधारित प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, समाजात स्त्री व पुरुष असा भेदभाव न करता दोघांना समान संधी देण्याची आज गरज आहे. समाजात लिंग समानतेबद्दल आज खुलेपणाने मत व्यक्त केले जात असले तरी ती भिनण्यास आणखी एक पिढी जावी लागेल. मात्र या बदलाची सुरुवात होऊन आपण त्या दिशेने ठोस पाऊले उचलीत आहोत ही स्वागतार्ह्य बाब आहे. लिंग समानतेबरोबरच, मासिक पाळी, मानसिक आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या बाबींविषयी देखील आणखी जागरूकता यायला हवी, असे आदित्य ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.
आपण स्वत: राजकारण येताना आपले आजोबा, वडील यांच्या राजकीय योगदानाचा प्रभाव तुमच्यावर असला तरी नागरिकांकडून ज्या अपेक्षा होतात त्याचे दडपण येते का, या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “दडपण घेतले की तुम्ही ते काम १०० टक्के करू शकणार नाही, हे मला समजले त्यामुळे दडपण न घेता जबाबदारी समजून मी आजवर काम करीत आलो आहे.” माझी आई ही नेहमीच माझ्यासाठी एक उत्तम श्रोता व गुरू राहिली असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.