डॉ. पी. डी. पाटील : साहित्य-संस्कृतीला विकासाशी जोडणारे शिक्षणतज्ज्ञ

Dr. P. D. Patil: An educationist who connects literature and culture with development
Dr. P. D. Patil: An educationist who connects literature and culture with development

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व पिपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, डॉ. पी. डी. पाटील यांचा आज ७१ वा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाने, कुशल नेतृत्वाने शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या डॉ. पी. डी. पाटील उर्फ ‘पीडी’ सर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा…

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून आजवर लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणारे ‘पीडी’ शिक्षणतज्ज्ञ म्हणून संपूर्ण देशाला सुपरिचित आहेत. शिक्षण, साहित्य व संस्कृतीची नगरी अशी पुण्याची ओळख. तर पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडला ज्ञानोबा-तुकोबांच्या वारकरी परंपरेचा अध्यात्मिक वारसा लाभल्याचे सर्वज्ञात आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील उद्योगधंद्याच्या उभारणीमुळे हा परिसर उद्योगनगरी, पुढे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनात खूप परिवर्तने झाली. जागतिकीकरणामुळे दळणवळण प्रचंड प्रमाणात वाढले. भांडवलाचा ओघ वाढू लागला. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग पुण्यात आणि त्यातही पिंपरी-चिंचवड परिसरात अधिक विस्तारले. पुण्यातून या भागात स्थलांतरही वाढले. त्यामुळेच शैक्षणिक-सांस्कृतिक आणि औद्योगिक अशी या शहरांची विभागणी कालबाह्य झाली असल्याचे पहिल्यांदा कुणाच्या लक्षात आले असेल तर, ते आहेत डॉ. पी.डी. पाटील.

कष्ट आणि यातना

पिंपरीतील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ तसेच संबंधित अन्य शिक्षणसंस्थांचा आजचा विस्तार, वैभव आणि लौकिक देशभर आणि जगभर असला तरी या संस्था उभ्या करण्यामागचे ‘पीडी’ सरांचे कष्ट आणि यातना नव्या पिढीला कदाचित दंतकथा वाटतील अशा आहेत. जागतिकीकरण होण्याच्या आधीच ऐंशीच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात खासगी शिक्षणसंस्थांना प्रोत्साहन द्यायला सुरवात केली होती. वसंतदादांच्या या पुढाकाराला प्रतिसाद देत डॉ. पी.डी. पाटील यांनी ४० वर्षांपूर्वी पिंपरीत इंजिनिअरींग कॉलेजपासून श्रीगणेशा केला. एक चळवळीत, प्रवाहात पी.डी. सरांनी धिटाईने उडी घेतली होती. ‘रक्ताचे पाणी करणे’ हा वाक्प्रचार त्यांना तंतोतंत लागू होईल, इतके श्रम पी.डी. सरांनी त्यावेळी घेतले. अक्षरशः रात्रीचा दिवस करत काम केलं. संस्था स्थापन केल्या आणि चिकाटीनं वाढवत नेल्या. कठीण परिस्थितीत ते खंबीर राहिले. कष्टांवर त्यांचा प्रामाणिक विश्वास होता. शेतकरी पण उच्चशिक्षित कुटुंबातून आल्याने सामाजिक जाणिवा, जबाबदाऱ्यांचे त्यांना भान होते.

अधिक वाचा  राहुल गांधींच्या सभेअगोदरच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

मुळचे सांगली जिल्ह्यात जन्मगाव असलेले डॉ. पी. डी. पाटील दापोडीत शिकले आणि मोठे झाले. तीच त्यांची कर्मभूमी. त्याप्रती आपण काही देणे लागतो, या भावनेतून पुण्याच्या या जुळ्या शहराला पुण्याइतकेच शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र करता येईल, हे त्यांनी हेरले. त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या उभारणीस सुरवात केली. शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून केवळ पदव्या देण्याचा संकुचित दृष्टिकोन ‘पीडीं’नी कधीच बाळगला नाही. शहरीकरणाकडून आणि आनुषांगिक सांस्कृतिक र्‍हास या समस्या फक्त पुणे किंवा पिंपरी-चिंचवड शहराच्या नसून त्या वर्तमान युगातील आहेत. एकविसाव्या शतकात तर या प्रश्‍नाने अधिकच गंभीर आणि जटिल स्वरूप धारण केले आहे. शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून अशा प्रश्नांची सोडवूणक करुन बदल घडविणाऱ्या मातब्बरांमध्ये पी. डी. सरांचा समावेश होतो.

साहित्य संमेलनाचा ‘टर्निग पॉइंट’

आध्यात्म आणि उद्योग यांना साहित्य-कला व्यवहारांची अर्थात सांस्कृतिक समृद्धीची जोड देणे हे ते आपले कर्तव्य मानतात. ‘साहित्यात जग बदलण्याची ताकद आहे’ असा या स्पष्ट जाणिवेचा स्पष्ट उच्चार पी. डी. करत असतात. म्हणूनच त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवले. या साहित्य संमेलनाने साहित्य संमेलनांच्या नियोजनाचा वस्तुपाठच घालून दिला असे म्हणण्यात काहीही अतिशयोक्ती नाही. साहित्य संमेलन ही काही कोणाला तरी मिरवण्यासाठी ‘मॅनेज’ करण्यात येणारा ‘इव्हेंट’ नाही. ते ‘येर्‍या गबाळ्याचे’ काम नाही. तेथे ‘जातीचे’च पाहिजे, हा धडा या संमेलनाने दिला. पिंपरीचे साहित्य संमेलन त्यांच्या आयुष्यातील आयुष्यातील ‘टर्निंग पॉइंट’ होताच; परंतु तो पिंपरी-चिंचवड शहराच्या इतिहासातीलही ‘टर्निग पॉइंट’ ठरला. औद्योगिकीकरणामुळे शहरीकरण झाले आणि वाढत्या शहरीकरणामुळे साहित्य आणि संस्कृती टिकणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली. ही भीती निरर्थक कशी ठरवायची हे पीडींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पी. डी. यांची ही कृती भौगोलिक अर्थाने पिंपरी-चिंचवड शहरामधील असली तरी तिचे परिणाम मात्र व्यापक आणि दूरगामी आहेत. साहित्याशी संबंध केवळ मिरवण्यापुरताच असे पी.डी. किंवा डी. वाय. पाटील विद्यापीठाबद्दल म्हणता येत नाही. सरांनी गेल्या आठ वर्षांच्या काळात अनेक साहित्यविषयक उपक्रम आणि आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर साहित्याचे होणारे परिणाम समजून घेतले. या प्रक्रियेत ते सक्रिय भूमिका बजावत राहिले.  जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठात १८वे जागतिक मराठी संमेलन भरवले. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या संस्कृतीला जगाशी जोडून घेण्याचा त्यांचा हा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे.

अधिक वाचा  बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण, नानावटी रुग्णालयात दाखल

आजवरच्या वाटचालीत पी. डी. सरांचा असंख्य लोकांशी संपर्क आला. प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्वामधील वेगळेपण जाणवले. ‘डॉ. पी. डी. पाटील यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेले डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आजच्या तरूणांच्या स्वप्नांना ताकद देत आहे.’, असे  उद्गार दिवंगत माजी राष्ट्रतपी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी पुण्यात काढले होते.

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे ‘पीडीं’विषयी म्हणतात, ‘८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी ‘साहित्य संचित’ हा बहुमोल ग्रंथ प्रकाशित केला. ज्यामध्ये भारतीय भाषांमधील ११ ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांच्या मुलाखती आहेत. पुस्तकांच्या विक्रीसाठी गाळ्यांच्या आलेल्या भाड्यात स्वतःची रक्कम टाकून हा निधी त्यांनी आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी हा निधी वाटला; शेतकऱ्याचा मुलगाच इतका परहितदक्ष होऊ शकतो.’

‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने पीडींच्या नेतृत्वात शिक्षण व वैद्यकीय विज्ञान ही मानवी सेवा केली असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न प्रा. सी. एन. आर. राव म्हणतात. तर ‘डॉ. पी. डी. पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे विद्यापीठ एक अनुकरण करण्यायोग्य शैक्षणिक मॉडेल असल्याचे पद्मविभूषण, शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन उल्लेख करतात.

पीडी सरांना गेल्या ४० वर्षांपासून ओळखत असून, अतिशय कष्टातून त्यांनी संस्थांची उभारणी केली आहे. त्यांचा हा प्रवास प्रेरक आहे. उत्तम दर्जाचे रुग्णालय त्यांनी पिंपरीत उभारले. अमेरिकेतील प्रसिद्ध सर्जन रॉबर्ट नैस्मिथ यांनी डी. वाय. पाटील रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना माहिती दिल्यानंतर बायडन यांनी नैस्मिथ यांना भारतात काम करण्यास सुचवले. हे डॉ. पी. डी. यांचे यश असल्याचे अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मॅक जावडेकर नमूद करतात.

अधिक वाचा  मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार

पीडींसारखा मित्र मिळणे भाग्य आहे. उच्च दर्जाचे शिक्षण देण्यामध्ये शिक्षणतज्ज्ञ असलेल्या पीडींचे नाव भारतात अग्रस्थानी आहे. उच्च शिक्षणातील गुणवत्तेची मानांकन त्यांनी सेट केले आहेत, असे शिक्षणतज्ज्ञ डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणतात.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणतात, डॉ. पीडी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात उज्वल भविष्य घडवण्यासाठी आपले प्रयत्न समर्पित केले आहेत. शिक्षण, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म अशा अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. ते एक प्रतिष्ठित मानवतावादी असून, उत्कृष्टता आणि प्रासंगिकता हे त्यांच्या शैक्षणिक आस्थापनांचे वैशिष्ट्य आहे.

डॉ. स्मिता जाधव यांचा जन्मदिन आणि लीडरशीप

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव असलेल्या डॉ. स्मिता जाधव यांचाही १७ फेब्रुवारी हा जन्मदिन आहे. स्मिताताई आणि त्यांचे वडील पी. डी. पाटील यांची जन्मतारीख एकच आहे. मराठीत याला दुग्धशर्करा योग म्हणतात. हा अपूर्व योगायोग ईश्वराने जुळवून आणला आहे. पी. डी. सरांच्या खांद्याला खांदा लावून स्मिताताई विद्यापीठाच्या कामकाजात सहभागी असतात. देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक असलेल्या विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून डॉ. स्मिता यांची कामाची धडाडी कुणीही हेवा करावा, अशीच आहे. ‘व्हिजनरी यंग लीडर’ म्हणून त्यांची गणना देशातील शैक्षणिक क्षेत्रात होऊ शकेल. एकविसाव्या शतकातील शिक्षणाचा केंद्रबिंदू आता तरुण आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांची शैक्षणिक लीडरशीप या काळाला साजेशी आहे. त्यांनी कामकाजात सर्वसमावेशकता आणि नाविन्यपूर्णतेचा एक नवीन दृष्टीकोन आणला आहे. त्यांचा गतिशील दृष्टीकोन आणि विद्यापीठाशी असलेले अतूट समर्पण विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांसाठी सारखेच प्रेरणादायी आहे.

पिंपरी आणि परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि संलग्न शिक्षणसंस्था सप्रवृत्तीच्या पी. डी. पाटील सरांनी प्रयत्नातून आणि त्यांच्या स्फूर्तीतून उभ्या राहिल्या. ‘प्रसाद’ हे सरांचे पहिले नाव. या संस्था म्हणजे त्यांची ‘प्रसादचिन्ह’ आहेत. ज्या मूर्तस्वरूपात आपल्याला दिसताहेत. शतायुषी होऊन या संस्थांची पुढची वाटचाल त्यांनी पाहण्यासाठी असं दीर्घायुष्य त्यांना लाभावं ही सदिच्छा!

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love